डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांच्याविषयी: |
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ले येथे दि. 10-10-1910 रोजी झाला. त्यांचे वडील शांताराम कोटणीस हे कामानिमित्त सोलापूरला स्थलांतरित झाले. त्यामुळे डॉ.द्वारकानाथांचे शालेय शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी मुंबईच्या ग्रँट मेडीकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस ची पदवी घेतली.
दुस-या महायुध्दाच्या काळात सन 1937 मध्ये चीन-जपान युध्दात जखमी झालेल्या चिनी लोकांना मदत करण्यासाठी भारताकडून सहा डॉक्टरांचे एक पथक पाठविण्यात आले. या पथकात डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश होता.
डॉ. द्वारकानाथ यांनी चीनमध्ये प्रत्यक्ष युध्दभूमीवर जाऊन प्रतिकूल हवामानात औषधे व साधन सामुग्रीची कमतरता असताना देखील अथक परिश्रम करुन अनेकांचे प्राण वाचवले.
अशा या सोलापूरच्या महान सुपुत्राने पीडित मानवतेसाठी आपले जीवन समर्पित केले व आंतरराष्ट्रीय बंधुत्वाची ज्योत तेवत ठेवली. म्हणूनच या थोर आंतरराष्ट्रीय डॉक्टराची जगाला ओळख व्हावी व त्यांच्या कार्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठीच सोलापूर महापालिकेकडून त्यांच्या सोलापूरातल्या निवासस्थानाचे स्मारकामध्ये सन २०१२ मधे रुपांतर करण्यात आले आहे.
ही वेबसाईट दि. ९-१२-२०१८ रोजी त्यांना सोलापूर महापालिकेकडून समर्पित करण्यात येत अाहे.