डॉ. कोटणीस यांच्याविषयीची पुस्तके व इतर साहित्य:

 
-
 
-
 
-
 
-
 
-1976 साली चीनमधील शि चा च्‍वांग येथे डॉ. कोटणीस स्‍मृती हॉल चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास डॉ. द्वारकानाथांचे थोरले बंधु श्री. मंगेश शांताराम कोटणीस हे हजर होते. या कार्यक्रमापासून स्फूर्ती घेऊन श्री मंगेश कोटणीस यांनी द्वारकानाथांचे चरित्र प्रथम इंग्रजीमध्‍ये लिहिले. “THE BRIDGE FOR EVER” या इंग्रजी चरित्राचे प्रकाशन 1982 साली सोमय्या प्रकाशनातर्फे प्रथम प्रसिध्‍द झाले. त्‍यानंतर त्‍याचे मराठी भाषांतर कोटणीस कुटुंबियांनी केले. हे चरित्र ‘समर्पण’ या नावाने मागोवा प्रकाशन, पुणे यांनी 1983 साली प्रसिध्द केले. शिवाय श्री. मंगेश कोटणीस यांनी ‘कथा द्वारकानाथाची’ हे काव्‍यमय चरित्र त्‍यानंतर लिहिले. गीत रामायणाच्‍या चालींवर स्वरबध्‍द केलेल्‍या या गीतांचा कार्यक्रम श्री. मंगेश कोटणीस यांच्‍या जन्‍मशताब्‍दीचे औचित्‍य साधून दि. 2 सप्टेंबर 2007 रोजी मुंबईमध्‍ये सादर करण्‍यात आला होता.

दि. 9 डिसेंबर 1982 रोजी डॉ. कोटणीस यांचे ‘An Indian Freedom Fighter In China’ हे इंग्रजी चरित्र, त्‍याचप्रमाणे या चरित्राचे हिंदी भाषांतर ‘महान स्‍वतंत्रता सेनानी’ अशी दोन पुस्‍तके चीनमध्‍ये प्रकाशीत करण्‍यात आली. त्‍यानंतरच्‍या काळात आत्‍तापर्यंत डॉ. कोटणीस यांच्‍या कार्याबद्दल चिनी लेखकांनी लिहिलेले वेगवेगळी अशी अंदाजे 25 पुस्‍तके तरी प्रसिध्‍द झाले आहेत.

डॉ. कोटणीस यांच्‍या 50 व्‍या स्‍मृती दिनानिमित्‍त 1992 साली त्‍यांच्या कार्याची सचित्र माहिती देणारी पुस्‍तके प्रकाशीत करण्‍यात आली. तसेच त्‍यांच्‍या चरित्रावरील माहितीपटही प्रदर्शित करण्‍यात आला. या निमित्‍त मोठे कार्यक्रम बीजींग व शि चा च्‍वांग येथे करण्‍यात आले.

बांडुंग परिषदेच्‍या 60 व्‍या दिनानिमित्‍त 2004 साली नवी दिल्‍ली येथे चिनी वकीलातीच्‍यावतीने सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर करण्‍यात आले. यामध्‍ये डॉ. कोटणीसांच्‍या महान कार्यावर आधारीत एक नाटिका चिनी कलाकारांनी सादर केली.

भारतीय वैद्यकीय पथक चीनमध्‍ये गेले, त्‍याला 70 वर्षे पूर्ण झाली त्‍यानिमित्‍त 2008 साली एक खास स्‍मरणिका चीनमध्‍ये समारंभ पुर्वक प्रकाशित करण्‍यात आली.

चीनमधील रेडियो, दूरदर्शन व वृत्तपत्रे आदी प्रसारमाध्यमांमधून भारतीय वैद्यकीय पथक व डॉ. कोटणीस यांच्‍या कार्याबद्दल अनेक कार्यक्रम सातत्‍याने सादर करण्‍यात येतात. डॉ. कोटणीसांबद्दलच्‍या पुस्तिका, सचित्र माहिती पत्रके, डॉ. कोटणीसांची प्रतिमा असलेले छोटे बिल्‍ले, त्‍यांच्‍या छायाचित्रांच्‍या तसविरी, त्‍यांची प्रतिमा कोरलेल्‍या लहान सिरॅमिक प्‍लेटस्, कोटणीसांचे धातूचे अर्धपुतळे इ. मोठ्या प्रमाणात चीनमध्‍ये प्रसारित करण्‍यात आले आहेत. डॉ. कोटणीसांची स्‍मृती कृतज्ञतापूर्वक जतन करण्‍यासाठी हरत-हेचे प्रयत्‍न केले जातात.

भारतामधे व्ही. शांताराम यांनी सन १९४६ मधे डॉ. कोटणीसांच्या संपूर्ण जीवनावर आधारित “डॉ. कोटणीस की अमर कहानी ” हा सिनेमा काढला.